कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने सोहळा
अनघा मोडक यांच्या विचारमंथनाने सर्व समाज मंत्रमुग्ध
महाड : रघुनाथ भागवत
ठराविक समाज बंधू-भगिनींच्या उपस्थितीत समाजभगिनी पौराहीत सौ सुनिता आंबुर्ले यांच्याद्वारे विधिवत महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ श्र्वेता आंबुर्ले यांच्या हस्ते पूजा-अर्चा करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीत रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ मुंबईच्या वतीने संस्थेच्या मुलुंड येथील कार्यालयात भगवान जिव्हेश्वर जयंती सोहळा संपन्न झाला. तसेच अनेक समाजबांधवांनी आप आपल्या निवासस्थानी मनोभावे जिव्हेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती सोहळा साजरा केला.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजनांच्या अधीन राहून रायगड जिल्हा स्वकुळ साळी सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष अविनाश साळी व सर्व कार्यकारिणी तसेच महिला मंडळ कार्यकारिणी अध्यक्षा श्वेता आंबूर्ले यांनी यावर्षी साध्या पद्धतीने भगवान जिव्हेश्वर जयंती सोहळा साजरा करण्याचे ठरवले आणि त्याचे तंतोतंत पालन करून मुलुंड येथील संस्थेच्या कार्यालयात मोजक्या समाज बांधवांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा साजरा करून सोहळ्याचा सर्व समाजबांधवांना लाभ घेता यावा म्हणून झूम ऍपच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचे प्रयोजन केले होते. याचा लाभ शेकडो समाजबांधवांनी घेतला. जयंती सोहळा पार पडल्यावर विविध कार्यक्रमांच्या सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष अविनाश साळी यांनी समाजबांधवांना संबोधित करताना लॉकडाऊनच्या दरम्यान आणि निसर्ग चक्रीवादळाने दिलेल्या तडाख्यात प्रभावित झालेल्या नुकसानग्रस्त समाजबांधवांना दिलेल्या आर्थिक साहाय्याचा तपशील दिला.
दरम्यान, जिव्हेश्वर जयंती सोहळ्याचे औचित्य साधून सुप्रसिद्ध निवेदीका कुमारी अनघा मोडक यांचे अंथरूण ते उंबरठा या विषयावर झूम च्या माध्यमातून सर्व समाजबांधवांच्या सहभागात विचारमंथन केले व अनेक अडचणी, संकटे यांच्यावर मात करणा-या विविध योद्ध्यांची उदाहरणे देऊन उत्कृष्ट समाज प्रबोधन केले. समाज भगिनी डॉ.सौ.प्रज्ञा हावरे-नरे, डॉ.सौ.शिल्पा कोळेकर-एक्के यांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन , सौ. प्रणिता शिपूरकर यांचे चित्रकलेतील वन स्ट्रोक प्रात्यक्षिक, कोव्हीड योद्धांचा गौरव आणि दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांंचा गुणगौरव सोहळा तसेच मनोरंजनात्मक विविध कला-गुणांना साक्ष ठेवून आगळावेगळा कार्यक्रम समाजबांधव राजेश तांबडे यांची संकल्पना असलेला सांस्कृतिक कार्यक्रम डिझिटल संगीत रजनी समस्त भारत देशातील आपल्या समाज बांधव-भगिनींना युट्युबच्या माध्यमातून दाखविण्यात आला. त्याचाही शेकडो समाजबांधवांनी पुरेपूर लाभ घेतला.
एकंदर दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि समाज बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत साजरा होणारा भगवान श्री जिव्हेश्वर जयंती उत्सव यावर्षी मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता साध्या पध्दतीने साजरा केलेल्या उत्सवाला चांगला प्रतिसाद लाभला. संस्थेचे अध्यक्ष अविनाश साळी व सर्व कार्यकारिणीने कोरोना महामारीत देखील योग्य नियोजन करून पार पडलेल्या सोहळ्याचे सर्व स्तरावर भरभरून कौतुक होत आहे.