पनवेल / प्रतिनिधी : दि.०१ऑगस्ट २०१४ पासून ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले असून,ठाणे जिल्हा व नवनिर्मित पालघर जिल्हा असे दोन जिल्हे अस्तित्वात आले आहेत.त्याप्रमाणे ठाणे पालघर अशा दोन जिल्हा परिषदा कार्यान्वित आहेत.ज्यावेळी ठाणे या जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवनिर्मित जिल्हा तयार झाला.त्यावेळेस पालघर जिल्ह्याला शिक्षक कमी पडल्याने आपल्या आस्थापनेत विकल्प वितरित करून ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या पालघर जिल्ह्यात केल्या.पालघर येथे नवीन शिक्षक भरती होताच जिल्हा परिषद ठाणेच्या आस्थापनेवरील शिक्षक पुन्हा जिल्हा परिषद ठाणे कडे वर्ग करण्यात येईल असे सांगण्यात आले होते.असे असुनही मागिल वर्षी जिल्हा परिषद पालघर आस्थापनेवर नवीन शिक्षक भरती होऊन सुद्धा,जिल्हा परिषद पालघर आस्थापनेवरील आदिवासी शिक्षक बांधवाना मूळ ठाणे जिल्हा परिषद आस्थापनेवर न सोडता खान्देश विभागातील लोकांना अधिक प्रमाणात सोडले गेले आहे.त्यामुळे ठाणे जिल्ह्यात मूलस्वरूपी वास्तव्य करणाऱ्या भूमीपुत्र आदिवासी शिक्षक बांधवाना जाणीवपूर्वक मूळ आस्थापनेवर न सोडल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येते. स्थानिक आदिवासी शिक्षक बांधवांचा बिंदु नामावलीनुसार बिंदु ठाण्यात पकडलेला असल्याने,त्यांना जिल्हा परिषद ठाणे आस्थापनेवर पुन्हा रुजू होण्याचा हक्क आहे.जिल्हा परिषद ठाणे आस्थापनेवरील आदिवासी शिक्षक जागाही रोस्टर नुसार रिक्त असल्याचे समजते.तरीही दोन्ही जिल्ह्याचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी आदिवासी शिक्षक बांधवांच्या प्रश्नांबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे,आदिवासी शिक्षक बांधवांमध्ये नाराजीच्या सुरावरून निदर्शनास येते.खान्देशी शिक्षक बांधवांनाच ठाणे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर अधिक बदल्या कशा मिळतात ? असा आदिवासी शिक्षकांना प्रश्न पडला आहे. आदिवासी शिक्षक बांधव भूमिपुत्र असुन देखिल त्यांच्यावर अन्याय होताना निदर्शनास येत आहे.जे शिक्षक ठाणे,पालघर व्यतिरिक्त जिल्ह्यातील मूळ रहिवास करणारे आहेत,ते ठाण्यात राहिले काय आणि पालघर मध्ये राहिले काय त्यांच्यासाठी दोन्ही जिल्हे समानच आहेत.कारण त्यांना आपल्या मूळ रहिवास करीत असलेल्या जिल्ह्यात तर बदली मिळणारच नाही,मग अशा शिक्षकांना नियमांना धाब्यावर बसवून बदल्या देण्यामागाचे कटकारस्थानामागचे प्रयोजन काय आहे? हे असे कसे घडते यामुळे स्थानिक भूमीपुत्र आदिवासी शिक्षक बांधवांच्या मनात संशयाची पाल चुकचुकल्याशिवाय रहात नाही.जिल्हा परिषद पालघर आस्थापनेवर स्थानिक भूमीपुत्र असे एकूण ३५ आदिवासी शिक्षक बांधव सद्य स्थितीस कार्यरत आहेत.अशा या बदल्यांमुळे स्थानिक भूमीपुत्र आदिवासी शिक्षक बांधवांच्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणावर वाताहत झाली आहे.
म्हणून शासन-प्रशासनाने स्थानिक भूमीपुत्र आदिवासी शिक्षक बांधवाना,त्यांच्या मूळ आस्थापनेवर विनाशर्त तत्काळ बदली देऊन,त्यांच्या परिवारासह त्यांची ओढाताण थांबवावी अशी मागणी आदिवासी समाजसेविका कविता निरगुडे यांनी कोकण विभागीय आयुक्त नवी मुंबई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
स्थानिक भूमीपुत्र आदिवासी शिक्षक बांधवाना त्यांच्या मूळ आस्थापनेवर पुन्हा बदली मिळावी. आदिवासी महिला समाजसेविका कविता निरगुडे यांची कोकण विभागीय आयुक्त नवी मुंबई यांच्याकडे पत्राद्वारे मागणी.