अत्यंत गंभीर अवस्थेत गर्भवतीवर त्वरित शस्त्रक्रिया
डॉक्टर बापलेकीने स्वतःचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय सेवेची बांधीलकी जपली.
पनवेल, दि.31 (वार्ताहर) - कोरोना या महामारी रोगामुळे बऱ्याच ठिकाणी खाजगी डॉक्टर लाॅकडाऊन आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. असे असताना पनवेल येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये अत्यंत गंभीर अवस्थेत आलेल्या एका पस्तीस वर्षीय महिलेला मागेपुढे न पाहता डॉक्टर प्रकाश पाटील आणि त्यांची कन्या डॉ. केतकी यांनी ऍडमिट करून घेतले व तिच्या गर्भाशयावर शस्त्रक्रिया करून खऱ्या अर्थाने जीवनदान दिले. वैश्विक संकटात डॉ पाटील यांनी वैद्यकीय सेवशी असलेली आपली बांधिलकी जपल्याचे दिसून आले.
कुंडेवहाळ येथून एका 35 वर्षीय महिलेला दोन-तीन ठिकाणी उपचारार्थ दाखल करून घेण्यात आले नाही. शेवटी तिच्या नातेवाईकाने लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये त्या महिलेला आणले. गर्भाशयाची नळी फुटल्याने जीव धोक्यात आला होता. डॉक्टर प्रकाश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली डॉक्टर कन्या केतकी पाटील-म्हस्के यांना सोबत घेऊन त्वरित ऑपरेशनची तयारी केली. दोघांनी तसेच सोबतीला असलेल्या परिचारिकांनी पी.पी.ई किट घालून यशस्वी शस्त्रक्रिया केली. गर्भाशयात साचलेल्या दीड लिटर रक्ताच्या गाठी व अडकलेला गर्भ बाहेर काढला. या महामारी रोगाच्या संकटात कोणताही विचार न करता डॉ प्रकाश पाटील आणि त्यांच्या कन्या डॉ. केतकी यांनी योग्य वेळी उपचार देऊन तीन मुलींच्या या जननीला खऱ्या अर्थाने जीवदान दिले.