महत्वाच्या बाबींकडे लक्ष वेधण्याकरिता कामोठे शहर मनसेचे पनवेल महापालिकेला निवेदन.

पनवेल / प्रतिनिधी : कामोठेची लोकसंख्या २ ते ३ लाखांच्या घरात आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कामोठे उपनगरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनामार्फत संपूर्ण कामोठे शहर कंटेन्मेंट झोन मध्ये घेण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने नक्कीच परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल.
सदर भागात बाहेरील लोकांना व येथील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव असेल अपवाद फक्त शासकीय व अत्यावश्यक सेवा व पोलीस इ. कामे करणारे नोंद करून जाऊ शकतील असा आदेश काढण्यात आला आहे. कामोठे शहरात जेवढे कोरोना बाधित आहेत त्यांचा मुंबई मध्ये अत्यावश्यक सेवेच्या कामानिमित्त प्रवासाचा इतिहास आहे. त्या कोव्हिड योद्धाना आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाशी लढा दयावा लागत आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबाला देखील याचा धोखा उद्भवत आहे. असे असताना देखील कामोठे शहर कंटेन्मेंट मध्ये असूनही अत्यावश्यक सेवेसाठी कामोठे बाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्याने धोखा हा तसाच राहत आहे. कामोठे शहरातील अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या योद्धाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच प्रशासनामार्फत येणाऱ्या प्रेस नोट मध्ये गेले २ दिवस काही रुग्णांना संक्रमण कुठून झाले याचा उल्लेख नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. पनवेल महापालिकेने आपल्या कुशल पद्धतीने नक्कीच कोरोनाला हरवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करेल याची खात्री आहे मात्र  तरीही काही सुचनांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामोठे शहराध्यक्ष रोहित दुधवडकर यांनी निवेदन देऊन लक्ष वेधले आहे व महापालिकेला योग्य त्या सूचनाही केल्या आहेत. 
सूचना पुढीलप्रमाणे:
१. अत्यावश्यक सेवेमध्ये जाणाऱ्या योद्धांची माहिती घेऊन त्यांची आठवढ्यातून किमान एकदा मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात यावी.

२. प्रेस नोट मध्ये रुग्णांच्या संक्रमणाच्या माहितीसोबत महानगरपालिकेतील एकूण संक्रमित रुग्ण व आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा व उर्वरित उपचार करत असलेल्या रुग्णांचा आकडा दैनंदिन नोट मध्ये प्रसिद्ध करावा. बरे झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा पाहून लोकांचा प्रशासनावरील विश्वास अजून वाढेल.

३. महानगरपालिका क्षेत्रातील सेवाभावी संस्था , लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने आयुष्य मंत्रालयाने सुचवलेल्या अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप मोफत स्वरुपात करण्याचा प्रयत्न करावा.

४. रक्ताचा तुटवडा लक्षात घेता प्रशासनामार्फत योग्य ती खबरदारी घेऊन रक्तदान करण्यासाठी नियोजन करण्यात यावे.
 
५. शहरातील महत्वाच्या वर्दळीच्या व दैनंदिन वापराच्या जागा निर्जंतुकिरण करणे. उदा. बँक ए.टी.एम., बाजारपेठ इ.