नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या दारूची दुकाने न उघडण्याच्या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत. अवैध दारूविक्रीची माहिती महिलावर्ग पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाला देणार. पनवेल / केवल महाडिक : महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यात कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व झोनमध्ये दारूविक्री करण्यास परवानगी दिली असताना पनवेल - उरणमध्ये मात्र मद्य विक्री बंद आहे. काहींच्या मते याचे प्रमुख कारण म्हणजे नवी मुंबई पोलिस आयुक्तांचा “इगो” असल्याची चर्चा सुरु आहे व त्याबाबत उरणचे आमदार महेश बालदी यांनी नुकत्याच पत्रकार परिषदेत हि खंत बोलून देखील दाखवली. बालदी म्हणाले कि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यात दारू विक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र असे असतानाही पनवेल - उरण तालुक्यात दारू विक्रीची दुकाने सुरु करण्यास नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने बंदी घातली. खरेतर नवी मुंबई पोलिसांच्या या पोलिसी खाक्याचे स्वागत अनेकांनी केले आहे व यामुळे कायदा व सुव्यवस्था देखील नवी मुंबईत अबाधित राहिली आहे. दारूबंदी असल्याने क्राईम रेट देखील कमी होत असून यामुळे भांडणतंटे, मारामारी - हाणामारी यासारख्या प्रकारातही घट झाल्याने नवी मुंबईतील महिला वर्गाने पोलीस आयुक्तांचे आभार मानले आहे व हि दारूबंदी अशीच राहावी व दारूची दुकाने पनवेल - उरणमध्ये उघडण्यास परवानगी देऊच नये यासाठी अनेका सामाजिक संस्था व कर्तव्यदक्ष नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. पेण कर्जत खालापूर चौक, रसायनी याठिकाणी दारू मिळणाऱ्या ठिकाणांवर गर्दी होत आहे यामुळे काळाबाजार होत आहे असे काहींचे मत असले तरी त्याठिकाणी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी व शासनाला याठिकाणी देखील दारूबंदी करण्यासाठी विनंती करावी अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे. पनवेल परिसर हा रेड झोनमध्ये येत असल्याने या भागात असलेल्या वाईन शॉप तसेच बियर शॉपी उघडण्यास शासनाने सध्या मनाई केली आहे. ही मनाई कायम ठेवून लॉकडाऊन पूर्ण उठत नाही तिथपर्यंत पनवेलमध्ये दारू विक्री बंदच ठेवावी अशी मागणी पनवेल परिसरातील विविध सामाजिक संघटना, संस्था व महिलानी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांकडे केली आहे.
पनवेलजवळ असलेल्या रसायनी, मोहोपाडा, पेण, कर्जत आदी भागामध्ये दारू विक्री करण्यास शासनाने परवानगी दिल्याने पनवेल परिसरातील मद्याप्रेमी दारू खरेदी कऱण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपली वाहने घेऊन त्याठिकाणी जात आहेत. अनेकवेळा सोशल डिस्टंसिंग पाळले जात असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची भीती जास्त आहे. सध्या पनवेल परिसरात इतर उद्योग धंदे उघडण्यास परवानगी देण्यात आल्याने बाजारात गर्दी दिसून येत आहे. उरण नाका परिसर तर गर्दीने भरून गेला आहे. अशा वेळी जर वाईन शॉप तसेच बियर शॉपी उघडण्यास शासनाने परवानगी दिल्यास नेहमीपेक्षा जास्त गर्दी याठिकाणी होऊन कोरोना वाढीस लागण्यास मदतच होणार आहे. सध्याच्या घडीला कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा वेळी सर्वांनी एकत्रितपणे येऊन ही कडी तोडणे आवश्यक आहे. परंतु सामाजिक भान न ठेवता अनेकजण रस्त्यावर बिनधास्तपणे मास्क न लावता फिरत आहेत. अशा वेळी मद्यविक्री करण्यास परवानगी दिल्यास मोठ्या प्रमाणात मद्यप्रेमी रस्त्यावर उतरतील व त्यातून रूग्ण संख्या वाढण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे अनेकांना चढ्या भावाने दारू विकत घेणे परवडत नसल्याने ते घरीच बसले आहेत. त्यामुळे घरातील वातावरणसुद्धा शांत आहे. परंतु हेच मद्यप्रेमी या दुकानातून दारू खरेदी करून घरी आल्याने घरातील शांतता भंग होणार आहे व या लॉकडाऊनच्या काळात घरगुती भांडणांचे प्रकारसुद्धा वाढणार आहेत. तसेच या मद्यप्रेमींचा नाहक त्रास पोलिस यंत्रणेला बसणार आहे. अशा वेळी महिलांची भूमिका रायगडच्या जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांनी समजून घेऊन कोणत्याही परिस्थितीत दारूची दुकाने उघडली न जात दारू विक्री बंदच ठेवावी व नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या कारवाईचे नेहमी स्वागत करून त्यांच्या निर्णयामागे सर्व संघटना व महिला ठामपणे उभे राहू असे देखील काहींनी बोलताना सांगितले. शासनाच्या महसूलापेक्षा जनतेचा जीव महत्वाचा आहे, कुटूंब महत्वाचे आहे. या दारूमुळे सध्याच्या काळात अनेक कुटूंब उद्ध्वस्थ होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. तरी ज्या प्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पनवेल परिसर व तालुक्याला या सेवेतून वगळले आहे. हिच भूमिका पुढेही कायम ठेवावी. त्याचप्रमाणे पनवेल शहरात व परिसरात छुप्या मद्यसाठा आणून तो विक्री केला जात आहे. अशांची माहिती आता संबंधित महिला स्थानिक पोलिस ठाण्याला तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाला देणार असून अशा ठिकाणी छापे टाकून तातडीने कडक कारवाई करावी म्हणजे यापुढे कोणी अशा प्रकारची दारू विक्री करण्यास धजणार नाही अशी रोखठोक भूमिका आता महिला वर्गाने घेतली असून नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या दारूची दुकाने न उघडण्याच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे