उरण मधील स्थानिक मराठी रिक्षा चालक, प्रवाशी कार (टॅक्सी) चालक आर्थिक संकटात.
जोपर्यंत लॉकडाऊन व संचारबंदी आहे तोपर्यंत महीना 10,000 रुपये देण्याची शासनाकडे मागणी.
उरण मधील स्थानिक राजकीय पुढारी नेते, सामाजिक संस्था, विविध स्वयंसेवी संस्था, दानशुर व्यक्तिंनी रिक्षा चालक, टेक्षी चालकांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून रिक्षा संघटना,टॅक्सी (कार) संघटना हे कोणत्या पक्षाचे आहेत हे न पाहता सरसकट सर्वांनाच मदत करण्याची गरज.
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे) : करोना या विषाणुजन्य व जीवघेन्या महाभयंकर रोगामुळे भारत देशासह महाराष्ट्र राज्यात सर्वत्र लॉक डाऊन व संचार बंदी लागू झाल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी व करोना रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक व्यवहार, सेवा बंद करण्याचे व अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारने दिले त्या अनुषंगाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह(अत्यावश्यक सेवा वगळता) खाजगी वाहतूक व्यवस्था, सेवा बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते. आता महाराष्ट्रातील परप्रांतीयांना शासनातर्फे घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली जात आहे. मात्र राज्यांतर्गत व जिल्हांतर्गत रिक्षा, टॅक्सी (कार)आदि खाजगी वाहनांना वाहन चालविन्यास,प्रवाशी वाहतुकीस बंदी घातल्याने खाजगी वाहतूक व्यवस्था ठप्प पडल्या. सरकारच्या परवानगी शिवाय कोणत्याच खाजगी वाहनांना प्रवाशी वाहतुकीस बंदी घातले गेले. 22 मार्च पासून संचारबंदी व लॉक डाऊन लागू झाले तेंव्हा पासून सर्व रिक्षा, प्रवाशी कार(टॅक्सी) बंद आहेत. आता पुन्हा लॉक डाऊन वाढला आहे आणि अजुन पुढेही लॉक डाऊन वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे रोजगाराविना लॉक डाऊन व संचारबंदीच्या संपूर्ण काळात घरी बसलेल्या रिक्षा चालक, टॅक्सी चालकांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.
सर्वसामान्य गोरगरिब घटकातील उच्चशिक्षित बेरोजगार व्यक्ति रोजगाराचे साधन म्हणून रिक्षा, टॅक्सी सेवेकडे बघतात. सध्या रिक्षा, टॅक्सी चालकांमध्ये स्थानिक मराठी बांधवांची,स्थानिक भुमीपुत्रांची संख्या महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे. उच्च शिक्षित असूनही अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही नोकरी न मिळाल्याने स्थानिक मराठी तरुण रिक्षा व टॅक्सी व्यवसाय सेवेत खूप मोठ्या प्रमाणात उतरले आहेत.अनेक मराठी तरुण बेरोजगारांसाठी रिक्षा चालविने, टॅक्सी चालविने हे उपजिविकेचे एकमेव साधन आहे. त्यांना जगन्यासाठी,कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी उपजिविकेचे किंवा उदरनिर्वाहाचे दूसरे कोणतेच साधन नसल्याने मराठी तरुण व या घरातील प्रमुख व्यक्तिवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांवर आर्थिक बेकारीची कु-हाड कोसळली असुन या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.अनेक दिवस वाहतूक व्यवस्थाच बंद असल्याने रिक्षा चालक, टॅक्सी चालक आर्थिक संकटात सापडले आहेत या रिक्षा चालक, टॅक्सी चालकांच्या घरात 6-7 कुटुंब सदस्य आहेत. घरातील आई वडील, मूल बाळ, पत्नीची सर्व जबाबदारी टेक्षी व रिक्षा चालविना-या कुटुंब प्रमुखावर आहे. त्यांचा दररोजचा जेवनाचा, आजारपणाचा खर्च, मुलांचा शिक्षणाचा खर्च आहे. हा संसाराचा गाडा चालविताना अगोदरच नाकी नउ आले असताना मध्येच करोना सारख्या रोगाने रिक्षा चालक, टॅक्सी चालकांच्या आशेवरच पाणी सोडले आहे.आता पर्यंत घरात जेवढ़े अन्न धान्य होते, पैसे होते ते आता संपले आहेत आता रिक्षा चालक, टॅक्सी चालकांकडे अन्न धान्य उरले नाही, संसार चालविण्यासाठी पैसे तर उरलेच नाही.त्यामुळे कुटुंबासाठी हात पसरावे तर कोणाकडे ? जगावे तरि कसे ? असा प्रश्न रिक्षा चालक, टॅक्सी चालकांना पडला आहे.
उरणचा विचार करता उरण मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगार स्थानिक मराठी तरुण रिक्षा, टॅक्सी चालवत असून करोना मुळे जाहिर झालेल्या लॉक डाऊन व संचार बंदीमुळे त्यांच्या पोटावर पाय आले आहे. त्यांची खूप मोठ्या प्रमाणात उपासमार सुरु आहे. खूपच हलाखीच्या परिस्थितीत रिक्षा चालक, टॅक्सी चालक व त्यांचे कुटुंब जगत आहेत. अश्या उरण मधील स्थानिक मराठी बेरोजगार तरुण जे आपले पोट भरन्यासाठी रिक्षा, टॅक्सी चालवितात. त्यांना अश्या संकट काळात आर्थिक मदतीची गरज आहे. संकटात सापडलेल्या या रिक्षा चालक, टॅक्सी चालकांना जोपर्यंत लॉक डाऊन आहे तो पर्यंत महीना 10,000 रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी उरण मधील विविध टॅक्सी चालक,रिक्षा चालक संघटनानी शासनाकडे केली आहे.या कामासाठी उरणचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर, विद्यमान आमदार महेशशेठ बालदि, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटिल, काँग्रेसचे जे.डी जोशी, शेकापचे माजी आमदार विवेकानंद पाटिल, मनसेचे अतुलशेठ भगत, JNPT चे विश्वस्त भूषण पाटिल आदिंनी या कामी पुढाकार घ्यावा अशी विनंती उरण मधील रिक्षा चालक, टॅक्सी चालकांनी खाजगी मध्ये बोलताना व्यक्त केली आहे.जनतेच्या नेहमी अड़ी अडचणीत प्रवाशांना मदत करणारा,जनतेची काळजी घेणारा, प्रसंगी देवदूतची भूमिका निभावुन एखाद्या नागरिकाचे प्राण वाचविणारा रिक्षा चालक, टॅक्सी चालक आज संकटाच्या चक्रव्यूहात सापडला आहे. त्यामुळे उरण मधील विविध दानशुर व्यक्ति, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,नेते, विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटना यांनी एखादा रिक्षा चालक, टॅक्सी चालक कोणत्या संघटनेचा आहे, कोणत्या राजकीय पक्षाचा आहे हे न बघता, राजकारण न करता सरसकट सर्व रिक्षा चालक, टॅक्सी चालकांना आर्थिक मदत मिळावेत यासाठी पुढे यावेत. अश्या भावना उरण मधील रिक्षा चालक, टॅक्सी चालकांनी व्यक्त केल्या आहेत.