राजे प्रतिष्ठान कामगार सेना व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे रिक्षाचालकांना फेस शिल्डचे वाटप. 


पनवेल / प्रतिनिधी : कोरोना साथीचा विषाणू कोविड  १९ आजार सध्या फैलावत चालला असून ३१ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित झाला असून त्यामुळे सर्वसामान्य रिक्षाचालक हवालदिल झाला आहे. रिक्षा व इतर कर्जाचे हफ्ते कसे भरायचे व घर कसे चालवायचे अशा परिस्थितीत रिक्षाचालक अडकलेला आहे. नुकतेच पनवेलमध्ये रिक्षाचालकांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताने तर रिक्षाचालक अधिक भयभीत झाले आहेत. काही रिक्षाचालक हे आजही पोट भरण्यासाठी रिक्षा चालवत असून काही अत्यावश्यक सेवेत देखील आहेत. अशा रिक्षाचालकांना आज राजे प्रतिष्ठान कामगार सेना व पत्रकार मित्र असोशिएशन यांच्यावतीने फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. पनवेल परिसरातील ८० रिक्षाचालकांना संस्थापक श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार तसेच अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामा, खजिनदार नारायण कोळी यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, पत्रकार मित्र असोसिएशनचे सचिव मनोहर सचदेव, सहसचिव संतोष आमले, अक्षय घाडगे यांच्यासह रिक्षा संघटना पदाधिकारी व रिक्षाचालक उपस्थित होते.