पनवेल / प्रतिनिधी : कोरोनाविरोधी लढाईमध्ये डॉक्टर, समाजसेवक, नर्सेस व त्यावश्यक सेवा यांच्यासोबतच महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांची मुख्य भूमिका आहे. विविध पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी हे आपले घरदार विसरून फक्त देशसेवेसाठी जागोजागी तैनात आहेत. अनेक ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच महिला अधिकारी व कर्मचारी तैनात असून गैरप्रकार व कोरोना संसर्ग समाजामध्ये जास्त प्रमाणात पसरू नये यासाठी मेहनत घेत आहेत. मात्र या पोलीस बंधू - भगिनींना कोणत्याही प्रकारचा सुरक्षा पोशाख शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. अनेकदा पोलीस बंधू भगिनींचा नाकाबंदी दरम्यान विविध प्रांतातील लोकांचा जवळून संबंध येत असतो. खरेतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त आहे कारण सर्व पोलीस हे आजही रस्त्यावर सुरक्षेसाठी उभे आहेत मात्र त्यांना हेल्मेट, मास्क, हॅन्डग्लोज, शूज व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विशेष असा पोशाख ज्यातून त्यांना संसर्ग होउ शकणार नाही असे साहित्य महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे मात्र अद्यापही शासनाकडून असे कोणतेही साधने पुरवले गेले नसल्याने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पत्राद्वारे सुरक्षा पोशाख पोलिसांना तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली असल्याचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र पोलीस दलातील बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ सुरक्षा पोशाख उपलब्ध करून द्यावा. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांची गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी.