*छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी व सेंट विल्फ्रेड कॉलेज यांच्या नावाच्या पाट्या मराठी भाषेत लावा राजे प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्र.* *आठ दिवसांची दिली मुदत अन्यथा स्वतः मराठीत बॅनर लावणार.*
पनवेल / प्रतिनिधी : मराठी राज्य भाषेचा सन्मान करण्यासाठी शिक्षण संस्था, बँका, दुकाने आणि अस्थापनांमध्ये फलक मराठीत असले पाहिजे. महाराष्ट्रातील अनेक शिक्षण संस्था, बँका, दुकाने आणि अस्थापनांमध्ये मराठी भाषेत पाट्या लावण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. सर्व संस्था, दुकाने व अस्थापनांना मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुकाने आणि संस्था अधिनियम १९४८ अन्वये बंधनकारक आहे. महाराष्ट्रात मराठी राजभाषा असल्याचे घोषित करणारा कायदा विधानमंडळात मंजूर होऊन ११ जानेवारी १९६५ रोजी महाराष्ट्र राजपत्रातून जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात राहत असाल तर महाराष्ट्राच्या राजभाषेचा सन्मान व्हायलाच पाहिजे असे असतानाही रायगड जिल्ह्यातील पनवेल शेडुंग येथील छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी व सेंट विल्फ्रेड कॉलेज येथील प्रवेश गेटवर असलेल्या पाट्या ह्या इंग्रजीत असून या युनिव्हर्सिटीने मराठीमध्ये असलेला मजकूर गावाच्या ठिकाणी लावलेला असून जाहिरात मराठीत करून लोकांची दिशाभूल करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये आपली युनिव्हर्सिटी चालवत असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने गैरकारभार करून याठिकाणी मराठी या भाषेला दुय्यम स्थान देऊन मराठी माणसांचा अपमान करण्याचे काम येथील व्यवस्थापक मंडळ करीत आहेत. याबाबत कायदेशरीरीत्या पत्र देण्यासाठी रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या नेतृत्वात राजे प्रतिष्ठानचे शिष्टमंडळ गेले असता येथे असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी सोनी यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली मात्र रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी त्यांना सांगितले कि आम्ही पत्र देण्यास आलो आहोत आठ दिवसात हे सर्व फलक मराठीत दिसले नाही तर आम्ही राजे प्रतिष्ठानतर्फे स्वतः त्याठिकाणी मराठी फलक लावू असा इशाराहि दिला. या युनिव्हर्सिटीमध्ये एकहि मराठी शिक्षक नसून सर्व बाहेरीतील राज्यातील लोक याठिकाणी काम करीत आहेत याबाबत राजे प्रतिष्ठान आक्रमक भूमिका घेऊन येथील सर्व गैरप्रकार बाहेर आणणार आहेच मात्र आता मराठीमध्ये फलक असले पाहिजेत यासाठी आम्ही पत्र दिले असल्याचे केवल महाडिक यांनी सांगितले. दरम्यान या चर्चेत मुख्य कार्यकारी अधिकारी सोनी यांनी आम्ही मराठीत पाट्या लावणार आहोत असे आश्वासन दिले आहे. याशिष्टमंडळात खांदा कॉलनी अध्यक्ष किरण पालये, उपाध्यक्ष सदाशिव मोरे, सचिव गंगाराम शिंदे, विनोद पिंगळे, वैभव पाटील, सिद्धेश भालेकर, सचिन गणेचारी, नितीन गणेचारी, अनिकेत अंकुश, संजू कतोरिया, सोनू चव्हाण, अनिकेत मोरे, विजय पाबळे, अक्षय पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी व सेंट विल्फ्रेड कॉलेज यांच्या नावाच्या पाट्या मराठी भाषेत लावा राजे प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्र.* *आठ दिवसांची दिली मुदत अन्यथा स्वतः मराठीत बॅनर लावणार.*